
औंध : शतकपूर्तीचा टप्पा पार करून १११व्या वर्षात पदार्पण केलेल्या रणवीर हनुमान गणेशोत्सव मंडळाने यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा केला आहे. औंध येथील हनुमान मंदिर परिसरात मंडळाच्या वतीने आकर्षक बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
मंडळाची १११ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आजही त्याच जोशात आणि उत्साहात सुरू आहे. धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही मंडळाकडून दरवर्षी प्राधान्य दिले जाते.
गणेशोत्सवानिमित्त लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, बाल मेळावा, जादूचे खेळ यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांसाठीही विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे गणेशोत्सवात परिसरातील नागरिकांसह लहान मुले आणि महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो.
गणरायाचे वाजत-गाजत आगमन तसेच उत्साहपूर्ण विसर्जन मिरवणूक काढण्याची परंपराही मंडळाने कायम ठेवली आहे. १११ वर्षांचा समृद्ध वारसा जपत पुढील पिढीलाही गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांशी जोडण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जात आहे.
मंडळाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, उपाध्यक्ष विनोद बोडके व अमोल खताळ, कार्याध्यक्ष विशाल शिंदे असून सागर पवार, दीपक मदने, समीर खताळ, सार्थक वाव्हळ आणि तुषार रानवडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.







