
जून २०२७ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे करावे लागणार काटेकोर नियोजन; अंतिम निर्णय महापौर आणि गटनेत्यांच्या बैठकीत होणार
पुणे : अपुरा पाऊस, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि शेतीसाठी धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, दिवाळीनंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत महापौर आणि सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे महापालिकेसाठी २०२६-२७ या जलवर्षासाठी वार्षिक १३.५ टीएमसी पाणीकोटा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आतापर्यंत ६.३५ टीएमसी पाण्याचा वापर झाला असून, ३० जून २०२७ पर्यंत उर्वरित ७.१५ टीएमसी पाण्यातून शहराची गरज भागवावी लागणार आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
यंदा पावसाळ्याच्या उत्तरार्धात, विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांसाठी धरणांमधून पाणी सोडावे लागत असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. सध्या दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून पाण्याची बचत करण्याचे धोरण राबविले जात आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा आणि शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता दिवाळीनंतर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची शक्यता आहे. त्यानुसार एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्याय प्रशासनाकडून विचाराधीन आहे.
दरम्यान, शहरातील सर्व भागांना समान दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठीही उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. पाणीगळती रोखणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याबाबत महापौर आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
त्यामुळे दिवाळीनंतर पुणेकरांना पाणीपुरवठ्याच्या नव्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.







