महापालिकेच्या कारवाईने तीर्थ टॉवर्सची सुरक्षा वाऱ्यावर? – संरक्षक भिंत व गेट तातडीने उभारण्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबन व बडतर्फीची रहिवाशांची मागणी.


पुणे : बाणेर-सूस येथील तीर्थ टॉवर्स सहकारी गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत आणि मुख्य प्रवेशद्वार पाडल्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाडण्यात आलेली संरक्षक भिंत तातडीने बांधून द्यावी, सोसायटीचे गेट पूर्ववत बसवावे आणि या बेकायदेशीर कारवाईस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे, अशी मागणी सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोसायटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण, सचिव भरत पासी आणि कमिटी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा वाघमारे यांनी भूमिका मांडली. यावेळी सोसायटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रणजित चव्हाण म्हणाले, ” आम्हाला पालिकेकडून आलेल्या नोटीसमध्ये केवळ सोसायटीची कमान पाडणार असल्याचे म्हटले होते. मात्र कमानीपासून २०० फूट दूर असलेली संरक्षक भिंतही पालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहे. या कारवाई संदर्भात सोसायटीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे, मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तीर्थ टॉवर्सची संरक्षक भिंत आणि मुख्य प्रवेशद्वार पाडले. या कारवाईमुळे सोसायटीची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. रहिवाशांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.”

 

संरक्षक भिंतीचे पुनर्बांधकाम पूर्ण होईपर्यंत पुणे महानगरपालिकेने संबंधित पोलिस कार्यालयाशी संपर्क साधून सोसायटी परिसरात नियमित पोलिस गस्तीची व्यवस्था करावी, अशी मागणी भरत पासी यांनी केली. संरक्षक भिंत आणि मुख्य प्रवेशद्वार नसल्यामुळे अनधिकृत प्रवेशाचा धोका वाढला असून, चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीसारख्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुनर्बांधकाम होईपर्यंत रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस गस्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, असे ते म्हणाले.

 

बेकायदेशीरपणे पाडण्यात आलेली संरक्षक भिंत २४ तासांच्या आत पुन्हा बांधून द्यावी आणि सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार त्वरित पूर्ववत बसवावे. रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यासाठी कोणतीही दिरंगाई करू नये. सोसायटीच्या लगतच्या परिसरात उंदीर, साप, डुकरे, भटकी कुत्री यांचा वावर आहे. सोसायटीच्या परिसरात लहान मुले खेळतात, महिला, ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या आवारात चालण्यासाठी येतात, पण अशाप्रकारच्या कारवाईमुळे लहान मुले वे ज्येष्ठ नागरीकांना एकट्याने फिरणे अवघड झाले आहे. संरक्षक भिंत नसल्याने मुलांसह महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे प्रज्ञा वाघमारे यांनी नमूद केले.

 

आम्ही सर्वसामान्य नागरीक आहोत, मात्र पालिका अशाप्रकारे कारवाई करत असेल तर आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. बांधकाम व्यावसायिक स्वत:च्या फायद्यासाठी यंत्रणांचा वापर करुन सर्वसामान्यांना वेठीस धरत आहेत. असे करणे चुकीचे असून प्रशासनाने आमच्या तक्रारीची त्वरीत दखल घ्यावी. स्थानिक नगरसेवकांनाही याबाबत कल्पना दिलेली असून त्यांनीही याकडे लक्ष घातलेले नाही. मत मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी अशावेळी कुठे जातात असा प्रश्न सोसायटीतील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!