
राज्यभरात १,०५७ ठिकाणी तपासणी; ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित, ५५७ ठिकाणांना सुधारणा नोटिसा
पुणे : दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठेत मसाले आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढत असताना, भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक मोहीम हाती घेतली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल १९ कोटी ६९ लाख रुपये किमतीचा ११ हजार ९६३ क्विंटल मसाले आणि मसालायुक्त पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून फराळासाठी विविध प्रकारचे मसाले, तिखट आणि इतर खाद्यपदार्थांची खरेदी केली जाते. याच काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे तसेच नियमांचे उल्लंघन करून तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेदरम्यान राज्यभरात मसाले आणि मसालायुक्त पदार्थांशी संबंधित तब्बल १ हजार ५७ ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळलेल्या ९४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ५५७ आस्थापनांना आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
गोदामांनंतर आता किरकोळ दुकानांवर लक्ष
आतापर्यंत प्रामुख्याने मसाल्यांची गोदामे आणि उत्पादन प्रकल्पांमध्ये तपासणी करण्यात आली आहे. आता या मोहिमेची व्याप्ती वाढवून किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांमध्येही कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मसाले आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. पॅकबंद पदार्थांची उत्पादन तारीख, अंतिम वापराची तारीख, उत्पादकाचे नाव आणि अन्न सुरक्षा परवाना क्रमांक तपासावा. संशयास्पद किंवा भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या फराळात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये भेसळ होऊ नये आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.







