
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०२६ पासून अनुदानित दरात घरगुती एलपीजी रिफिल मिळविण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (Biometric Aadhaar Authentication) पूर्ण करणे आवश्यक केले आहे. या प्रक्रियेमुळे एलपीजी अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष आणि पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास तसेच वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढविण्यास मदत होणार आहे.
ज्या ग्राहकांनी यापूर्वीच बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, त्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. त्यांना रिफिलची बुकिंग पूर्वीप्रमाणे करता येणार आहे. १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत देशातील २७.४३ कोटी सक्रिय घरगुती LPG ग्राहकांनी, म्हणजेच सुमारे ८९.९ टक्के ग्राहकांनी हे प्रमाणीकरण पूर्ण केले असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
डिलिव्हरीवेळीही करता येणार प्रमाणीकरण
ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. सिलिंडरची डिलिव्हरी देताना डिलिव्हरी कर्मचारी त्यांच्या मोबाईलवरील संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनीच्या अॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करून देऊ शकतो. तसेच ग्राहक संबंधित गॅस वितरकाच्या कार्यालयात जाऊनही प्रमाणीकरण करू शकतात.
याशिवाय ग्राहकांना घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. इंडेन ग्राहकांसाठी IndianOil ONE, भारत गॅस ग्राहकांसाठी HelloBPCL आणि HP Gas ग्राहकांसाठी HP PAY या अॅपद्वारे ही प्रक्रिया करता येते.
प्रमाणीकरण न करणाऱ्यांसाठी पर्याय
बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करू इच्छित नसलेल्या किंवा ते करण्यास सक्षम नसलेल्या ग्राहकांनाही LPG उपलब्ध राहणार आहे. मात्र, अशा ग्राहकांना संबंधित ऑइल मार्केटिंग कंपनीच्या डिजिटल माध्यमातून हा पर्याय नोंदवावा लागेल. त्यांना स्थानिक उपलब्धतेनुसार अनुदानाशिवाय लागू बाजारभावाने ५ किंवा १० किलोचे LPG सिलिंडर मिळू शकतील.
३० जूनपासून मुदतवाढीची मालिका
बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी सुरुवातीला ३० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांना अधिक वेळ देण्यासाठी ही मुदत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली आणि अखेर १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत करण्यात आली. आता १ ऑक्टोबरपासून अनुदानित दरातील रिफिल बुकिंगसाठी प्रमाणीकरणाची अट लागू होणार आहे.
ग्राहकांनी काय करावे?
ज्या ग्राहकांनी अद्याप बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. LPG सेवांबाबत मदतीसाठी 1800 2333 555 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.
केंद्र सरकारच्या मते, LPG अनुदानाचा लाभ वास्तविक ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आणि वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता व उत्तरदायित्व मजबूत करणे हा या प्रमाणीकरण मोहिमेचा उद्देश आहे.






