
औंध : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांपैकी एकूण १८ अर्ज वैध ठरले आहेत. वैध अर्जांमध्ये बहुतांश अर्जदार हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असल्याचे दिसून येत असून, या निवडीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण तीन स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून तीन जागांसाठी दुपटीपेक्षा अधिक इच्छुकांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतिम निवड कोणाची होणार, याबाबत परिसरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अनेक इच्छुकांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसारच अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे बोलले जात आहे.
३ जागांसाठी १८ वैध अर्ज आल्याने इच्छुक उमेदवारांमध्येही धाकधूक वाढली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून नेमकी कोणत्या निकषांवर निवड केली जाते आणि अंतिम तीन नावे कोणती असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘तीन जागांसाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार?’ याबाबत प्रभाग ८ व प्रभाग ९ परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निवडीपूर्वी इच्छुकांच्या नावांबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात असले, तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार हे निश्चित.






