
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन पीएमपीचे विशेष नियोजन; रात्री उशिरापर्यंत भाविकांना मिळणार सार्वजनिक वाहतुकीची सुविधा.
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांसाठी पीएमपीकडून विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान शहरात तब्बल ६२६ अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, विशेष बससेवा पहाटे २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
रात्रीच्या अतिरिक्त बससेवेसाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही. मात्र, पीएमपीच्या नियमित दैनिक पासची वैधता रात्री १२ वाजेपर्यंतच असल्याने त्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वतंत्र तिकीट काढावे लागणार आहे.
गणेशोत्सवातील गणपती आगमन तसेच विसर्जन मिरवणुकांमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बदलली जाते. या पार्श्वभूमीवर मनपा भवन, डेक्कन आणि स्वारगेट येथून आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गांवर बससेवा चालविण्यात येणार आहे.
१४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत एकूण ६२६ जादा बस सेवेत असतील. विशेष गर्दी लक्षात घेऊन १७, १८ आणि २४ सप्टेंबर रोजी तब्बल २८५ अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. तसेच गौरी विसर्जनानंतर १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊनही अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रवाशांची संख्या आणि गरज वाढल्यास पहाटे दोननंतरही अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेणाऱ्या भाविकांना सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार मिळणार आहे.
दरम्यान, मेट्रोने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरा त्यांच्या घराजवळ पोहोचता यावे यासाठी प्रमुख मेट्रो स्थानकांवरूनही विशेष बससेवा उपलब्ध राहणार आहे. रामवाडी, पिंपरी-चिंचवड आणि स्वारगेट मेट्रो स्थानकांवर रात्रीच्या वेळी पीएमपीच्या बस उपलब्ध असतील.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता पीएमपीची ही विशेष बससेवा पुणेकरांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.





