पुणेरी मेट्रो पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श ठरणार! ५,५०० नवीन झाडांची लागवड; ६० कोटी लिटर पाण्याची बचत.


२८ हजार टन कार्बन उत्सर्जन टाळले; ७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती, ७५० झाडांचे पुनर्रोपण

 

पुणे : माण–हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान सुरू होणारी पुणे मेट्रो लाईन-३ केवळ सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय ठरणार नाही, तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीत पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर, सौर ऊर्जा निर्मिती, वृक्षलागवड, वृक्षांचे पुनर्रोपण आणि पाण्याची बचत अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे २८ हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टळले असून, ६० कोटी लिटर पाण्याची बचत झाली आहे.

 

पीएमआरडीएच्या मुख्य महानगर अभियंता रिनाज पठाण यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्पाच्या पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांची माहिती दिली.

 

५,५०० नवीन झाडांची लागवड; ७५० झाडांचे पुनर्रोपण

 

मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे बाधित झालेल्या वृक्षांच्या बदल्यात ५,५०० नवीन झाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच, ७५० झाडांचे अन्य ठिकाणी यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुनर्रोपण केलेल्या झाडांचा जगण्याचा दर ८० टक्के असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे विकासकामांसोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात आला आहे.

 

२८ हजार टन कार्बन उत्सर्जन टाळले

 

मेट्रोच्या बांधकामात ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग (जीजीबीएस) या पर्यावरणपूरक पर्यायी साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे सुमारे २८ हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टाळण्यात यश आले. याशिवाय दोन हजार टन स्टील आणि ६० कोटी लिटर पाण्याची बचत करण्यात आली आहे.

 

७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती

 

मेट्रो स्थानके आणि कार डेपो येथे मिळून ७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमता उभारण्यात आली आहे. यामध्ये स्थानकांवर ६.१० मेगावॅट, तर कार डेपोमध्ये १.५० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. या हरित ऊर्जेमुळे प्रकल्पाच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे ३० टक्के गरज भागवली जाणार आहे.

 

मेट्रोमुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा

 

माण–हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२०३ किलोमीटर मार्गावर १७ स्थानकांमधून सुरुवातीला प्रवासी सेवा सुरू होणार आहे. गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार असल्याने खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. परिणामी रस्त्यांवरील वाहनांची संख्या, इंधनाचा वापर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

 

हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर या भागांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण आणि ४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे.

 

वाढते शहरीकरण आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार करताना पर्यावरण संवर्धनाची सांगड घालण्याचा प्रयत्न पुणे मेट्रो लाईन-३ मधून करण्यात आला आहे. मात्र, वृक्षलागवड केलेल्या रोपांचे दीर्घकालीन संगोपन आणि पुनर्रोपित झाडांचे संवर्धन कितपत प्रभावीपणे होते, यावर या पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रत्यक्ष यश अवलंबून राहणार आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!