
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक; नुकसानीचा सविस्तर अहवाल मागविला
मुंबई : राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १८ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. शेतपिकांचे झालेले नुकसान, पाणीटंचाई, चारा उपलब्धता तसेच स्थानिक परिस्थितीचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या १८ जिल्ह्यांचा समावेश आहे.
मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद आणि मूग या पिकांवर परिस्थितीचा परिणाम झाला आहे. विदर्भात कापूस, मूग, उडीद आणि तूर या पिकांचे नुकसान झाले असून, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये संत्रा पिकालाही मोठा फटका बसल्याचे बैठकीत निदर्शनास आले.
संत्रा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावढगाळ वातावरणामुळे संत्रा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांत जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ऊस कारखाने लवकर सुरू झाल्यास गाळप हंगाम कमी कालावधीचा राहू शकतो. परिणामी पुढील काळात चारा उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाजही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान आणि इतर अडचणींचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्राप्त अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून परिस्थितीनुसार प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचाही विचार करून आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.




