पुणे मेट्रो लाईन-३ चे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; ४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा सुरू!


हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास होणार सुसाट; गर्दीच्या वेळेत दर ६ मिनिटांनी मेट्रो, पहिली फेरी सकाळी ६ वाजता

पुणे : पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित माण–हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ अर्थात ‘पुणेरी मेट्रो’ (पिंक लाईन) चे लोकार्पण ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून सकाळी ६ वाजता प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील पहिल्या टप्प्यात १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

२३.२०३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग; १७ स्थानके सुरू होणार

पुणे मेट्रो लाईन-३ ही २३.२०३ किलोमीटर लांबीची संपूर्ण उन्नत मेट्रो मार्गिका आहे. माण येथून सुरू होणारी ही मेट्रो हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बालेवाडी, औंध आणि गणेशखिंड मार्गे शिवाजीनगरला जोडली जाणार आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, सुरुवातीला १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली होतील.

उर्वरित सहा स्थानकांपैकी दोन स्थानकांचे काम नोव्हेंबर २०२६ अखेर, तर अन्य चार स्थानकांचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो

४ नोव्हेंबरपासून मेट्रोची पहिली फेरी सकाळी ६ वाजता सुरू होईल. माण स्थानकावरून जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता, तर जिल्हा न्यायालयातून माणच्या दिशेने जाणारी शेवटची मेट्रो रात्री ११.४० वाजता सुटेल.

– गर्दीच्या वेळेत दर ६ मिनिटांनी मेट्रो.
– इतर वेळेत दर १२ मिनिटांनी मेट्रो.
– पहिली फेरी सकाळी ६ वाजता.
– माण ते जिल्हा न्यायालय शेवटची फेरी रात्री १०.३० वाजता.
– जिल्हा न्यायालय ते माण शेवटची फेरी रात्री ११.४० वाजता.

जिल्हा न्यायालय स्थानकावर मेट्रोच्या तिन्ही मार्गिकांची जोडणी

जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) मेट्रो स्थानकावर लाईन-३ ची जोडणी महामेट्रोच्या लाईन-१ (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) आणि लाईन-२ (वनाज ते रामवाडी) यांच्याशी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो बदलून पुणे शहरातील विविध भागांत प्रवास करता येणार आहे. तिन्ही मार्गिकांसाठी संयुक्त तिकीट ॲपची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बालेवाडी आणि बाणेरमध्ये पार्किंगची सुविधा

मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्वतःची वाहने पार्क करता यावीत, यासाठी बालेवाडी आणि बाणेर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

– बालेवाडीतील अमर टेक पार्क परिसरात सुमारे ३० हजार चौरस फूट पार्किंग.
– बाणेरमधील एबीझेड परिसरात सुमारे २१ हजार चौरस फूट पार्किंग.

याशिवाय मेट्रो स्थानकांवरून पीएमपीएमएल बस, रिक्षा, ओला-उबर टॅक्सी आणि ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

महिला ट्रेन पायलट चालवणार सर्व मेट्रो गाड्या

या मेट्रो प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व मेट्रो गाड्या सुमारे १०० महिला ट्रेन पायलट चालवणार आहेत. तसेच स्टेशन नियंत्रक, तिकीट कर्मचारी आणि स्टेशन अटेंडंट यांसह स्थानकांवरील एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५० टक्के महिला असतील.

दररोज अडीच लाख प्रवाशांना लाभ होण्याचा अंदाज

या प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी, औंध, म्हाळुंगे आणि शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. दररोज सुमारे दोन ते अडीच लाख प्रवासी या मेट्रो सेवेचा लाभ घेतील, असा अंदाज पीएमआरडीएने व्यक्त केला आहे.

सुमारे ८,३१३ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत ७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता उभारण्यात आली असून, एकूण वीज गरजेपैकी सुमारे ३० टक्के वीज हरित ऊर्जेतून उपलब्ध होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी, प्रवासासाठी लागणारा वेळ आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने पुणे मेट्रो लाईन-३ महत्त्वाची ठरणार आहे. आता ३ नोव्हेंबरच्या लोकार्पणानंतर ४ नोव्हेंबरपासून पुणेकरांना या नव्या मेट्रो सेवेचा प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!