खडकवासला धरणातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; महापौर-आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट.


पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ थांबवा! दूषित सांडपाणी मिसळण्याचा मुद्दा मुख्य सभेत उपस्थित; अमोल बालवडकर यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

 

पुणे : खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला. नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, तसेच त्यांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली.

 

खडकवासला धरणातील पाण्याच्या शुद्धतेचा प्रश्न उपस्थित करत अमोल बालवडकर यांनी महापौर आणि महापालिका आयुक्तांचे या समस्येकडे लक्ष वेधले. यावेळी विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्त यांना ‘वॉटर प्युरिफायर’ भेट देऊन दूषित पाण्याच्या प्रश्नावर प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी केली.

 

दूषित सांडपाण्याचा स्रोत शोधून बंद करण्याची मागणी

 

खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा मुद्दा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असल्याचे बालवडकर यांनी अधोरेखित केले. पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

धरणात मिसळणाऱ्या दूषित सांडपाण्याचा स्रोत तातडीने शोधून तो बंद करावा, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करावी आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळत असल्याची खात्री द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावरही त्यांनी भर दिला.

 

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

 

भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी जबाबदार व्यक्ती किंवा संस्थांची निश्चिती करून नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

 

‘पुणेकरांना आश्वासने नकोत, शुद्ध पाणी हवे,’ अशी भूमिका मांडत प्रशासनाने केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करावी, असे आवाहन अमोल बालवडकर यांनी केले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करून पुणेकरांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!