
पुणे : बाणेर येथील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०१८ मध्ये उभारण्यात आलेल्या स्मार्ट सिटी क्लिनिकची दुरवस्था झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून क्लिनिकमध्ये पाण्याची सुविधा नसणे, छतावरील पत्र्यांमधून गळती होणे तसेच उंदीर आणि इतर जीवजंतूंचा वावर वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या क्लिनिकमध्ये लहान बालकांचे नियमित लसीकरण केले जात असताना डॉक्टर, परिचारिका, बालके आणि महिलांना चक्क चटईवर बसून कामकाज करावे लागत आहे.
नगरसेवक तथा पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य अमोल बालवडकर यांनी या परिस्थितीवरून महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. क्लिनिकच्या दुरवस्थेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला वारंवार निदर्शनास आणून देऊनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप बालवडकर यांनी केला आहे.
या क्लिनिकमध्ये लहान बालकांना नियमित लसीकरण दिले जाते. मात्र, क्लिनिकमधील असुविधांमुळे डॉक्टर, परिचारिका, लहान बालके आणि महिलांना क्लिनिकच्या प्रवेशद्वाराजवळ चटई अंथरून खाली बसावे लागत असल्याचे बालवडकर यांनी म्हटले आहे. आरोग्यसेवा देणाऱ्या केंद्राचीच अशी अवस्था असेल, तर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा कशा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या परिस्थितीला महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप बालवडकर यांनी केला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या क्लिनिकची अशी दुरवस्था होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
बाणेरमधील स्मार्ट सिटी क्लिनिकच्या दुरवस्थेची तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांची व्यवस्था करावी, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली आहे. महापालिकेने लवकरात लवकर ठोस उपाययोजना न केल्यास सत्ताधारी आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांविरोधात तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.







