एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा; शीतल तेली-उगले यांचे निर्देश

मतदार नोंदींतील त्रुटी दूर करण्यासह मॅपिंग पूर्ण करण्यावर भर; शिक्षक-पदवीधर निवडणुकीत मत अवैध ठरू नये यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना
पुणे : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील सर्व कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी दिले. मतदार नोंदींमधील त्रुटी दूर करणे, मतदारांचे मॅपिंग पूर्ण करणे आणि मतदार यादीतून नावे वगळताना संबंधित पुराव्यांची काळजीपूर्वक पडताळणी करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह आयुक्त तथा नोडल अधिकारी संजीव पलांडे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
एसआयआर कार्यक्रमाच्या कामाचा आढावा घेताना तेली-उगले यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी, अशा सूचना दिल्या. पुनरीक्षणाचे काम अचूकपणे आणि निर्धारित वेळेत पूर्ण होईल, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, दावे निकाली काढण्याचा कालावधी आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करताना अशा तीन टप्प्यांमध्ये मतदार यादी निरीक्षकांकडून विभागातील प्रत्येक जिल्ह्यात भेट देऊन कामाची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार तेली-उगले यांनी पुणे जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात एसआयआरअंतर्गत झालेल्या कामाची माहिती दिली. तसेच १७, १८ आणि २४, २५ ऑक्टोबर रोजी शनिवार-रविवारी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
शिक्षक-पदवीधर निवडणुकीत मत अवैध ठरू नये यासाठी जनजागृती करा
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या या निवडणुकीत मत अवैध ठरणार नाही, यासाठी मतदान कसे करावे, याची माहिती देणारी भित्तिपत्रके छापून ती मतदान केंद्रांवर लावावीत. तसेच समाजमाध्यमांद्वारेही व्यापक जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या मतदार याद्यांची तपासणी करून दुबार नावे शोधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी आहेत, त्यांना याबाबत कळवून संबंधित मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याची माहिती लेखी स्वरूपात घ्यावी, असेही तेली-उगले यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीचे पुनरीक्षण वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यासोबतच विधान परिषद निवडणुकीत मतदान वैध ठरण्यासाठी मतदारांमध्ये योग्य माहिती पोहोचवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.







