पुण्यात १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पाणी बचतीसाठी महापालिकेचे नागरिकांना आवाहन.


पुणे : कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढील काळासाठी काटकसरीने नियोजन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेने शहरात १५ ऑक्टोबर २०२६ पासून दर गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी जलस्रोतांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा निर्णय शासनाच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

 

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा परिणाम पुढील वर्षीही जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना १६ ऑक्टोबर २०२६ पासून पाणी वापरामध्ये किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत सुरू ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार कपात वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरण साखळीतील २६ सप्टेंबर २०२६ अखेरचा टीएमसी पाणीसाठा आणि मागील वर्षांच्या तुलनेतील उपलब्धता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतील उपलब्ध जलसाठा तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज यांचा आढावा घेण्यात आला आहे.

 

पाणीपुरवठा व्यवस्थेवरील ताण कमी करून उपलब्ध जलसाठ्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या उपाययोजनेमुळे आगामी काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली आहे.

 

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सूचना

 

महापालिकेने नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. घरातील नळ, सार्वजनिक स्वच्छतागृहांतील नळ, फ्लश टाक्या आणि पाइपलाइनमधील गळती तातडीने दुरुस्त करावी. वाहन धुणे, अंगण किंवा पदपथ स्वच्छ करणे यासाठी महापालिकेचे पाणी वापरणे टाळावे.

 

खासगी व सार्वजनिक जलतरण तलाव, तसेच उद्यानांच्या देखभालीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करावा. आंघोळ, भांडी आणि कपडे धुण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. हॉटेल, रेस्टॉरंट, महाविद्यालयीन वसतिगृहे, सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांनीही पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात.

 

घरगुती वापरातून निर्माण होणाऱ्या तुलनेने स्वच्छ सांडपाण्याचा (ग्रे वॉटर) पुनर्वापर करावा. पाणी साठवताना गरजेपुरताच साठा करावा आणि अनावश्यक साठवण टाळावी. सार्वजनिक ठिकाणी पाण्याची गळती किंवा पाइपलाइन फुटल्याचे आढळल्यास त्वरित महापालिकेला कळवावे. अनधिकृत नळजोडणी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

 

तक्रारींसाठी संपर्क

 

पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या कॉल सेंटर क्रमांक १८००-१०३०-२२२, व्हॉट्सॲप क्रमांक ९६८९९००००२ किंवा PMC Care ॲपवर संपर्क साधावा. पाणी बचतीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!