महाराष्ट्रात मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.


अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध; पात्र नागरिकांना नाव नोंदणी व दुरुस्तीची संधी

 

पुणे : महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करून राबविण्यात येणाऱ्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती सादर करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने पुन्हा वाढ केली आहे. त्यानुसार, आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, नोटीस बजावणे आणि प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.

 

या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेद्वारे मतदार यादीतील नावांचा समावेश, वैयक्तिक तपशिलांमधील दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार हरकती नोंदविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी, विशेषतः नवमतदारांनी, वाढीव मुदतीचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कार्यवाही करावी.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!