समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुणे महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल; ADB सोबत चर्चा.


१४ गावांतील पाणीपुरवठा प्रकल्पांसह पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेवर भर; अर्थसहाय्य आणि तांत्रिक सहकार्याबाबत चर्चा

पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह पावसाळ्यातील पाणी निचऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका (PMC) आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यात अर्थसहाय्य आणि तांत्रिक सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आशियाई विकास बँकेच्या जल व नागरी विकास विभागाचे संचालक सातोशी इशी, खासगी क्षेत्र कार्य विभागाचे संचालक मयंक चौधरी, वरिष्ठ नागरी विकास विशेषज्ञ (वित्त व गुंतवणूक) मुक्ता मल्होत्रा यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

उर्वरित १४ गावांतील पाणीपुरवठा प्रकल्पांवर चर्चा

या बैठकीत महापालिकेत समाविष्ट झालेल्या उर्वरित १४ गावांमधील पाणीपुरवठा प्रकल्पांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्राधान्यक्रम निश्चित केलेल्या गावांमध्ये पावसाळी पाणी निचरा व्यवस्था विकसित करण्याच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.

या प्रकल्पांसाठी आवश्यक अर्थसहाय्याचे पर्याय, तांत्रिक सहकार्य आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीपूर्वी करावयाची तयारी या मुद्द्यांवरही विचारविनिमय झाला.

नागरिकांना मिळणार दर्जेदार नागरी सुविधांचे उद्दिष्ट

समाविष्ट गावांमध्ये वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि पावसाळी पाणी निचरा यांसारख्या मूलभूत सुविधांचे बळकटीकरण महत्त्वाचे ठरत आहे. आशियाई विकास बँकेसोबतच्या सहकार्याच्या माध्यमातून या भागांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!