
औंध : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी चतु:शृंगी वाहतूक विभागाच्या वतीने औंध गाव परिसरात रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आले. या अभियानात औंध गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच श्री शिवाजी विद्या मंदिर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रस्त्यावर सुरक्षितपणे वावरणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांनीही वाहतूक सुरक्षेच्या उपक्रमात सहभाग घेत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष सूर्यकांत कलापूरे, सुनील शिंदे, सुरेश रानवडे, अनिल गोळे, उत्तम रानवडे, सुनील चोंधे, सुनील खोंड, नथू मानमोडे, भगवान रानवडे यांच्यासह औंध परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
श्री शिवाजी विद्या मंदिर शाळेचे प्राचार्य नवले सर, लगड सर, जायबायकर सर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे आणि पोलीस उपनिरीक्षक दिनेश गडांकुश यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रस्ता सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला.








