हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात १७ स्थानके सुरू होणार!


माण ते जिल्हा न्यायालयापर्यंत मेट्रो धावणार; आयटी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार

 

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या पुणे मेट्रो लाईन ३ च्या पहिल्या टप्प्यात एकूण १७ स्थानके सुरू होणार आहेत. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच वाकड, बालेवाडी, औंध आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

 

माण ते जिल्हा न्यायालयापर्यंत १७ स्थानके

 

पहिल्या टप्प्यात माणपासून सुरू होणारा हा मेट्रो मार्ग जिल्हा न्यायालयापर्यंत पोहोचणार आहे. या टप्प्यातील १७ स्थानके पुढीलप्रमाणे आहेत.

 

1. माण

2. माण – एमआयडीसी सर्कल फेज २

3. माण बस डेपो

4. हिंजवडी फेज २ – सर्कल २

5. हिंजवडी फेज २ – सर्कल १

6. पद्मभूषण चौक

7. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी

8. हिंजवडी फेज १

9. वाकड चौक

10. श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे/बालेवाडी

11. मिटकॉन बालेवाडी

12. आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी

13. औंध

14. सकाळ नगर

15. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

16. कृषी महाविद्यालय

17. जिल्हा न्यायालय

 

आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास होणार सुसाट!

 

हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज हजारो कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत हिंजवडी, वाकड, बालेवाडी आणि औंध परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बराच वेळ प्रवासात खर्च होतो. मात्र, मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वेगवान पर्याय मिळणार आहे.

 

मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे शहरातील महत्त्वाच्या भागांदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होणार असून, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासही मदत मिळणार आहे.

 

उर्वरित सहा स्थानकांबाबत काय?

 

बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर-पाषाण लिंक रोड, भोसले नगर–आरबीआय आणि शिवाजीनगर या उर्वरित सहा स्थानकांच्या तांत्रिक कामांसह आवश्यक सुरक्षा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!