
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि विनाअडथळा होण्यासाठी मेट्रो स्थानके व परिसराची संयुक्त पाहणी; वाहतूक नियोजनावर भर
पुणे : पुणेकरांना मेट्रोचा विनाअडथळा लाभ घेता यावा, यासाठी सर्व प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुणेरी मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२७ ऑक्टोबर) मेट्रो स्थानके आणि परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि सुरळीत होण्यासाठी वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पुणे वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे, पीएमआरडीएचे महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह प्रशासनातील आणि PITCMRL चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठ चौकातील जंक्शनचे डिझाइन, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन्स तसेच कृषी महाविद्यालय मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच सिमला चौक आणि संचेती चौकातील वाहतुकीचा आढावा घेण्यात आला. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचताना नागरिकांना अडचणी येऊ नयेत आणि रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित राहावी, यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनीही वाहतूक सुरक्षितता आणि मेट्रो स्थानकांपर्यंत प्रवाशांची ये-जा सुलभ करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी पीएमआरडीए प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे आव्हान आता संबंधित यंत्रणांसमोर आहे.






