
देशातील मेट्रोचे जाळे २४८ किलोमीटरवरून १२०० किलोमीटरवर; २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू असल्याची पंतप्रधानांची माहिती
पुणे : पुणे हे केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर नसून आयटी, ऑटोमोबाईल, औषधनिर्मिती, स्टार्टअप, नवकल्पना आणि उत्पादन क्षेत्रातील देशातील तरुणांच्या स्वप्नांचे केंद्र बनले आहे. पुण्यातील मेट्रो कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाल्यामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३ चे लोकार्पण केले. तसेच पुणे मेट्रो टप्पा-२ मधील चार नव्या मार्गिकांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मेट्रो प्रकल्पांमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत होणाऱ्या बदलांवर भाष्य केले.
मोदी म्हणाले, “चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे पुण्याचा विकास अधिक वेगाने होईल. नव्या मेट्रो प्रकल्पांमुळे शहराची वाढ आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.”
पुण्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप, इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये पुणे देशातील युवकांसाठी स्वप्ने आणि आकांक्षांचे केंद्र आहे. अशा परिस्थितीत मेट्रो कनेक्टिव्हिटी मजबूत झाल्याने पुण्याच्या विकासाला नवी चालना मिळेल.
शहराची ओळख आता केवळ उद्योगांवर नाही!
शहराची ओळख आता केवळ तेथील उद्योग, खाद्यसंस्कृती किंवा उत्पादनांवर ठरत नाही. शहर किती स्पर्धात्मक आहे आणि तेथील नागरिकांना राहण्यासाठी किती सुलभ सुविधा उपलब्ध आहेत, हेही महत्त्वाचे निकष बनले आहेत. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि नागरिकांना अधिक सुविधा मिळतात. शहराचा वेळ वाचला की उत्पादकता वाढते आणि त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. अर्थव्यवस्था वाढल्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांनाही मिळतो, असे मोदी यांनी नमूद केले.
देशातील मेट्रोचे जाळे १२०० किलोमीटरवर
२०१४ मध्ये देशात केवळ २४८ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यरत होते. त्यावेळी फक्त पाच शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध होती. आज देशातील २६ शहरांमध्ये मेट्रो धावत असून मेट्रोचे जाळे जवळपास १२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भारताचे मेट्रो नेटवर्क आज जगातील आघाडीच्या तीन मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेट्रो प्रकल्पातून रोजगारनिर्मिती
महाराष्ट्रातील मेट्रो विस्ताराचाही त्यांनी उल्लेख केला. २०१४ मध्ये राज्यात केवळ १० ते ११ किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यरत होते. आता ही लांबी सुमारे १७५ किलोमीटर झाली असून ६८० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील गुंतवणुकीमुळे कामगार, अभियंते, दुकानदार आणि विविध उद्योगांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे मोदी म्हणाले.
पुण्यातील मेट्रो मार्गिका सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात आल्याचा उल्लेख करताना, सरकार आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांतून विकासाचे नवे मॉडेल उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
लहान शहरांनाही विकासाची केंद्रे बनवण्यावर भर
शहरे ही केवळ राहण्याची ठिकाणे नसून देशाच्या आर्थिक घडामोडींची महत्त्वाची केंद्रे आहेत. देशातील शेकडो लहान शहरांनाही सक्रिय विकासकेंद्रांमध्ये रूपांतरित करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून शहरी विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीचा मार्ग खुला केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिवाळीच्या आनंदात दुष्काळग्रस्त नागरिक, शेतकरी कुटुंबे आणि संकटात असलेल्या लोकांचीही आठवण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाने एकजुटीने संकटांचा सामना करावा, असेही ते म्हणाले.
पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिका आणि आगामी विस्तारामुळे आयटी क्षेत्रासह शहरातील विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार असून, प्रवासाचा वेळ वाचविण्यासोबतच पुण्याच्या आर्थिक आणि नागरी विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.






