
‘सन्मान राष्ट्रगीताचा, अभिमान पुणेकरांचा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० वीरमाता व वीरपत्नींचा विशेष सन्मान
पुणे : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दीपप्रज्वलन सोहळ्यात तब्बल ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. या विक्रमी दीपप्रज्वलनाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली असून, या ऐतिहासिक कामगिरीमुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘सन्मान राष्ट्रगीताचा, अभिमान पुणेकरांचा’ या संकल्पनेतून शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी हा भव्य सोहळा पार पडला. हजारो पणत्यांच्या प्रकाशाने ऐतिहासिक शनिवारवाडा उजळून निघाला. देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या ५० वीरमाता आणि वीरपत्नींचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या त्याग आणि समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.
यावेळी राज्याच्या मंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, ब्रिगेडियर तरुणेश, कर्नल विकास सावळजे, कर्नल श्रीनिवास सातवळेकर, कर्नल राजेशकुमार जिंदाल, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता शेकटकर, उपायुक्त टेंगळे, नगरसचिव योगिता भोसले, मुख्य अभियंता बिपीन शिंदे यांच्यासह सन्माननीय नगरसेवक-नगरसेविका, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत परीक्षक स्वप्नील डांगरीकर यांनी या विक्रमाची अधिकृत घोषणा करून प्रमाणपत्र प्रदान केले.
३८ हजार २३३ पणत्यांच्या प्रकाशातून साकारलेला हा विश्वविक्रम केवळ दीपप्रज्वलनापुरता मर्यादित नसून, पुणेकरांची एकजूट, राष्ट्रप्रेम आणि भारतीय सैन्यदलाप्रती असलेली कृतज्ञता अधोरेखित करणारा ठरला. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात आणखी एका मानाच्या पानाची भर पडली आहे.






