सणांच्या आनंदातही सुरक्षेचे रक्षक कर्तव्यावर! बालेवाडी फेडरेशनकडून अग्निशमन जवानांचा सन्मान.


ला विदा सोसायटीतील आगीच्या घटनेत जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणणाऱ्या जवानांच्या कार्याचे कौतुक; सोसायट्यांमधील अग्निसुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणार

 

पुणे : आपण दिवाळी, गणेशोत्सव, ईद यांसह विविध सण उत्साहात आणि आनंदात साजरे करतो. मात्र, या आनंदाच्या क्षणीही काही जण स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. सीमेवरील जवान, पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे त्यापैकीच एक. त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनतर्फे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

बालेवाडी येथील ला विदा सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी आग लागण्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच बाणेर आणि पाषाण परिसरातील अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत फायर ऑफिसर मेमाणे साहेब आणि त्यांच्या पथकातील जवानांनी २२व्या मजल्यापर्यंत चढून जाऊन पाण्याचे पाइप जोडले आणि अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे आग पुढे पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

 

या वेळी बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या समन्वयामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणणे शक्य झाले. या कामगिरीबद्दल ला विदा सोसायटीचे चेअरमन किरण बालवडकर, कमिटी सदस्य सूरज सिंह, राकेश समर्थ, धवल चित्रोदा, विनोद बालवडकर तसेच सोसायटीतील सर्व रहिवाशांनी अग्निशमन दल आणि पोलिसांचे आभार मानले.

 

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनतर्फे फायर ऑफिसर मेमाणे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना मेमाणे साहेब म्हणाले, “नागरिकांच्या सेवेसाठी अग्निशमन दलाचे जवान अहोरात्र तत्पर असतात. मात्र, आग लागल्यानंतर उपाययोजना करण्याबरोबरच आग लागू नये यासाठी नागरिकांनी आणि सोसायट्यांनीही आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.”

 

यावेळी त्यांनी नागरिकांनी घ्यावयाची अग्निसुरक्षेची काळजी, सोसायट्यांमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत व कार्यान्वित ठेवण्याचे महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.

 

बालेवाडी परिसरातील सोसायट्यांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी फेडरेशनच्या वतीने लवकरच विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी दिली.

 

याप्रसंगी ॲड. इंद्रजीत कुलकर्णी यांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले, तर शकिल सलाती यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला फेडरेशनचे दफेदार सिंह आणि रमेश रोकडे उपस्थित होते.


भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

15
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

error: Content is protected !!