वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुण्यात ३१ किमीचे भुयारी मार्ग; ‘पाताळ लोक’ प्रकल्पाला गती.


 

भोसरी ते उंड्री आणि भूगाव ते एरंडवणे असे दोन मार्ग प्रस्तावित; डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीला आयुक्तांची मंजुरी

 

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाकांक्षी ‘पाताळ लोक’ प्रकल्पाच्या नियोजनाला गती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात सुमारे ३१ किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत भुयारी मार्ग उभारण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्यास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंजुरी दिली आहे.

 

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसराचा झपाट्याने विस्तार होत असून, वाहनांची वाढती संख्या आणि अपुऱ्या रस्ते क्षमतेमुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाताळ लोक’ प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. सुरुवातीला येरवडा ते कात्रज असा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, व्यवहार्यतेच्या अडचणींमुळे हा प्रस्ताव पुढे नेण्यात आला नाही. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने तसेच टॉमटॉम डेटा, गुगल ट्रॅफिक इंटेलिजन्स आणि नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धतींचा अभ्यास करून दोन नवीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

 

पहिला भुयारी मार्ग भोसरी ते उंड्रीदरम्यान प्रस्तावित असून, त्याची लांबी सुमारे २३ किलोमीटर असेल. भोसरी, संगमवाडी, धोबीघाट, कोंढवा मार्गे हा मार्ग उंड्रीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे शहराच्या उत्तर भागातून दक्षिण भागात जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसेच भविष्यात पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो.

 

दुसरा भुयारी मार्ग भूगाव येथील राम नदीपासून एरंडवणे येथील डी. पी. रोडपर्यंत प्रस्तावित आहे. सुमारे आठ किलोमीटर लांबीचा हा मार्ग राम नदी, डुक्कर खिंड आणि एरंडवणे परिसराला जोडणार आहे. त्यामुळे पश्चिम पुण्यातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार असून, डुक्कर खिंड परिसरातील भौगोलिक अडथळा पार करणे शक्य होणार आहे.

 

या प्रकल्पाची आखणी करताना शहरातील रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल, मेट्रो आणि पीएमपीएमएल बससेवा यांचा एकात्मिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने विचार करण्यात येत आहे. केवळ भुयारी मार्गांची निर्मिती न करता विविध वाहतूक पर्यायांची परस्पर जोडणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

दरम्यान, या प्रकल्पाचे स्वरूप व्यापक असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच संरक्षण मंत्रालयाच्या कार्यक्षेत्राशी संबंधित विविध परवानग्या आणि समन्वयाची आवश्यकता भासणार आहे. सध्या प्रकल्प प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यात असून, प्रस्तावित मार्गांचा तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरणीय व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

 

प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास पुणे शहराच्या उत्तर-दक्षिण आणि पश्चिम भागातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतील. मात्र, या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी डीपीआर, प्रशासकीय मान्यता आणि निधीची उपलब्धता या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत.


भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

15
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

भक्तिसंगीताच्या सुरांनी बाणेरमध्ये रंगली दिवाळी पहाट; नामवंत गायकांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध! गणेश कळमकर व माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या पुढाकारातून श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

error: Content is protected !!