
आयुक्तांच्या मनाईनंतरही गिफ्ट बॉक्स घेऊन व्यक्तींचा महापालिका भवनात प्रवेश; भेटवस्तू नेमक्या कोणासाठी आणि सुरक्षा यंत्रणा करतेय काय?
पुणे : पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, पुरवठादार तसेच अन्य संबंधित व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, या आदेशानंतरही महापालिका भवनात भेटवस्तूंची आवक सुरूच असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयांमध्ये मिठाई, फराळ, सुकामेवा, गिफ्ट हॅम्पर्स, भेटवस्तूंची व्हाउचर्स आणि रोख रक्कम स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. शहर अभियंता कार्यालयाकडून यासंदर्भात ३ नोव्हेंबर रोजी निर्देश जारी करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मात्र, आदेश जारी झाल्यानंतरही महापालिका भवनात गिफ्ट बॉक्स घेऊन व्यक्ती येत असल्याचे व्हिडिओ आणि वृत्त समोर आले आहे. एका व्यक्तीने गिफ्ट बॉक्सची पिशवी महापालिका इमारतीत आणल्याचा प्रकारही चर्चेत आला आहे. संबंधित व्यक्तीला गिफ्ट कोणासाठी आणले आहेत, अशी विचारणा करण्यात आल्यानंतरही त्याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसल्याचे वृत्त आहे. काही गिफ्ट बॉक्स महापालिकेच्या तळमजल्यावर ठेवण्यात आल्याचेही समोर आले आहे.
विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाने भेटवस्तू स्वीकारण्यासच नव्हे, तर मुख्य इमारत, विभागीय आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात भेटवस्तू आणणे व त्यांचे वितरण करण्यासही मनाई केली आहे. अशा परिस्थितीत भेटवस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तींना इमारतीत प्रवेश कसा मिळतो, सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी होते का आणि संबंधित भेटवस्तू कोणाकडे पोहोचवल्या जातात, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर ठेकेदार, विकासक आणि विविध व्यावसायिकांचे हितसंबंध अवलंबून असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडून भेटवस्तू स्वीकारण्यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.
आदेश काढून जबाबदारी संपली का?
महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केवळ परिपत्रक काढून चालणार नाही, तर प्रवेशद्वारावरच भेटवस्तू घेऊन येणाऱ्यांना रोखण्याची जबाबदारी सुरक्षा विभागाने पार पाडणे आवश्यक आहे. महापालिका भवनात आलेल्या भेटवस्तू कोणासाठी होत्या, त्या कोणी स्वीकारल्या आणि संबंधित प्रकरणात जबाबदारी निश्चित झाली का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
आता महापालिका आयुक्त या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का, की भेटवस्तूंवरील बंदीचा आदेश केवळ कागदावरच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






