
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ८ फेब्रुवारीपासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होईल.
दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार असून, १५ फेब्रुवारीपासून दहावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे.
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, मंडळाने सध्या परीक्षांचा कालावधी जाहीर केला असून विषयनिहाय अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विषयवार अंतिम वेळापत्रकासाठी मंडळाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आगाऊ जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.









