बालेवाडीत बांधकामाच्या धुळीने नागरिक त्रस्त. नदीलगतच्या रेडीमिक्स काँक्रीट प्लांटवर नागरिकांचा आक्षेप; तातडीने बंद करण्याची मागणी.


बालेवाडी : जुपिटर हॉस्पिटलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम प्रकल्पांमुळे परिसरात धूळ व धुराचे प्रमाण वाढल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. संबंधित बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रेडीमिक्स काँक्रीट (RMC) प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नदीलगत सुरू असलेल्या या प्लांटला परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बांधकामाच्या ठिकाणी RMC प्लांटमधून काँक्रीट तयार करण्याची प्रक्रिया, बांधकाम साहित्याची वाहतूक तसेच इतर कामांमुळे परिसरात धुळीचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ येत असून, नागरिकांना दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याची वेळ येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

यापूर्वी ‘स्टॉप वर्क’ची कारवाई

संबंधित बांधकाम प्रकल्पावर काही महिन्यांपूर्वी नियमांचे पालन न केल्याने ‘स्टॉप वर्क’ आदेश देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बांधकाम सुरू ठेवण्यात आले होते . प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना केल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात परिसरातील धूळ आणि धुराचे प्रमाण कमी झाले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग तसेच पर्यावरण विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मात्र, तक्रारी करूनही संबंधित प्रकल्पावर अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महापालिकेकडून कारवाई करण्यात येते; मात्र त्यानंतर काही काळात पुन्हा बांधकाम सुरू राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेची कारवाई केवळ कागदोपत्रीच राहते का, असा सवाल उपस्थित होत आहे.

‘संगनमता’चा आरोप

संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप परिसरातील काही नागरिकांनी केला. त्यामुळे या बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घालण्याचे काम अधिकाऱ्यांमार्फत होत आहे असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला.

नदीलगत उभारण्यात आलेल्या RMC प्लांटमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम, प्लांटसाठी आवश्यक परवानग्या तसेच बांधकाम प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RMC प्लांट तातडीने बंद करण्याची मागणी

बालेवाडी परिसरातील वाढते धूळ-धूर प्रदूषण लक्षात घेता संबंधित RMC प्लांटची तातडीने तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्लांट बंद करण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच बांधकाम प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याबाबत पुणे महानगरपालिका बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पाहणी करून या बांधकामावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!