पुणे : औंध-स्पाइसर रोडवर गेल्या आठ दिवसांपासून ड्रेनेजच्या चेंबरमधील सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहनचालक, परिसरातील दुकानदार आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या रस्त्यावरून दररोज अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांना दिवसभर दुर्गंधी सहन करावी लागत असून, त्यांच्या व्यवसायावरही याचा परिणाम होत आहे. या परिसरात जवळच शाळा असल्याने विद्यार्थ्यांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे पुणे शहरात डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना, दुसरीकडे रस्त्यावर सांडपाणी साचून राहत असल्याने आरोग्यविषयक चिंतेत भर पडत आहे. सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
औंध-स्पाइसर रोडवरील ड्रेनेजच्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यावर साचलेले सांडपाणी हटवावे, तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .







