बालेवाडीत कारखाली चिरडून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा चालकाचा प्रयत्न, CCTVमुळे प्रकार उघड.


पुणे : बालेवाडी येथील ममता चौक परिसरात रस्त्यालगत झोपलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीच्या अंगावरून कार गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने पोलिसांना घटनेबाबत चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कारचा मार्ग आणि CCTV फुटेज तपासल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळ शोधून काढले.

मृत व्यक्तीचे नाव बाबा बाबुराव चव्हाण (वय ५४) असून ते कात्रज येथील रहिवासी होते. ते मजुरीचे काम करत होते. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यालगत किंवा पदपथावर ते झोपत असत.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास चालक बालेवाडीतील ममता चौकाजवळ कारमधून डावीकडे वळत होता. त्याचवेळी दुसरे वाहन कारच्या अगदी जवळून गेल्याने धडक टाळण्यासाठी चालकाने कार अचानक डावीकडे वळवली. यावेळी रस्त्यालगत झोपलेल्या चव्हाण यांच्या अंगावरून कार गेली.

अपघातानंतर चालकाने जखमी चव्हाण यांना कारमध्ये घेतले. बाणेर रोडवर गस्तीवरील पोलिस पथक दिसल्यानंतर त्याने रस्त्यावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळल्याचे आणि उपचारासाठी रुग्णालयात नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर चव्हाण यांना औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर चालकाने पोलिसांना आणखी एका ठिकाणी नेऊन चव्हाण तेथे आढळल्याचा दावा केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांनी कारने घेतलेला मार्ग तपासला असता संशय निर्माण झाला. त्यानंतर CCTV फुटेज तपासण्यात आले आणि ममता चौकाजवळच चव्हाण यांना कारने धडक दिल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी बाणेर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून चालकाचा शोध सुरू आहे. बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी या घटनेची माहिती दिली.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!