
पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने (PMC) शहरातील प्रमुख चौकांमध्ये 500 ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, या मनुष्यबळासाठी वर्षभरात सुमारे 17 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वाहतूक पोलिस विभागाकडून शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक विभागाने सुचविलेल्या 242 चौकांमध्ये प्रत्येकी दोन ट्रॅफिक वॉर्डन आणि एक वाहतूक पोलिस कर्मचारी अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय बावधन वाहतूक विभागातील आठ चौकांसाठी 16 वॉर्डनची आवश्यकता लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 250 चौकांमध्ये 500 ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्याचे नियोजन आहे.
या वॉर्डनच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने चौकांवरील वाहतूक नियमन, वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी मदत केली जाणार आहे. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, या कामासाठी निविदा प्रक्रिया न राबविता तातडीच्या तरतुदींनुसार कार्यवाही करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे. महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेशासाठी लागणारा वेळ लक्षात घेता तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी 316 ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया प्रस्तावित होती. मात्र त्यानंतर वॉर्डनची संख्या वाढवून 500 करण्याचा प्रस्ताव पुढे आला. या प्रक्रियेबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली असली तरी, प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापनाची तातडीची गरज लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
शहरातील प्रमुख चौकांवर हे वॉर्डन प्रत्यक्षात कधीपासून तैनात होणार आणि कोणत्या चौकांना प्राधान्य दिले जाणार, याबाबतची अंमलबजावणीची माहिती महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.







