दिवाळीच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडला जाताय? थांबा! मध्यवस्तीत वाहतूक कोंडीचा विळखा.


दिवाळीच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडला जाताय? थांबा! मध्यवस्तीत वाहतूक कोंडीचा विळखा

 

लक्ष्मी, कुमठेकर आणि केळकर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; नो-एंट्री आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालक हैराण

 

पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठेत जाण्याचा विचार करत असाल, तर घरातून निघण्यापूर्वी वाहतुकीची परिस्थिती जाणून घ्या! सणासुदीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने पुण्याच्या मध्यवस्तीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यासह शहरातील प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

 

शनिवारी (२४ ऑक्टोबर) दिवसभर मध्यवर्ती भागातील वाहतूक संथ झाल्याचे चित्र दिसून आले. दिवाळीसाठी कपडे, दागिने, फराळाचे पदार्थ आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठांकडे वळत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढली असून, वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

 

लक्ष्मी रस्त्यावर वाहनांच्या रांगा

 

फडके हौद ते लाल महाल चौक तसेच क्वार्टर गेट चौक ते टिळक चौक या भागातील लक्ष्मी रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. कुमठेकर आणि केळकर रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याशिवाय फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि टिळक रस्त्यावरही वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दिसून आले.

 

नो-एंट्रीतून वाहने, दुहेरी पार्किंगचा त्रास

 

वाहतूक कोंडीला केवळ वाहनांची गर्दीच नव्हे, तर बेशिस्त पार्किंगचीही जोड मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला तसेच नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी केली जात आहेत. काही ठिकाणी दुहेरी पार्किंगमुळे रस्त्यावरील वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत आहे. त्यातच नो-एंट्रीचे नियम धाब्यावर बसवून वाहने प्रवेश करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा आणखी वाढत आहे.

 

पुढील दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता

 

दिवाळीच्या खरेदीसाठी पुढील काही दिवस बाजारपेठांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात जाणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, वाहन पार्किंगसाठी अधिकृत जागांचा वापर करावा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत.

 

दरम्यान, प्रमुख बाजारपेठांच्या परिसरात वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवून नो-एंट्री आणि नो-पार्किंगच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

पुणेकरांनो, दिवाळीची खरेदी करायला लक्ष्मी रस्त्यावर जाण्यापूर्वी वाहतुकीचा अंदाज घ्या आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा विचार करा!


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!