पुणे : टोरंट कंपनीच्या सायडिंगर-१ जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यातील जंगल परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३२ हजार झाडे तोडली जाणार असल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत १ हजार ८२५ झाडे तोडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोरंटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी २० ऑक्टोबरपासून कर्जत येथील जंगल परिसरात वृक्षतोड सुरू झाली आहे. २४ ऑक्टोबरपर्यंतच्या नोंदीनुसार, १ हजार ८२५ झाडे तोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या वृक्षतोडीमुळे परिसरातील नैसर्गिक पर्यावरण आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणार असल्याच्या वृत्तामुळे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची तसेच संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विकासकामे करताना पर्यावरणाचे संरक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पातील वृक्षतोडीबाबत संबंधित प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापनाची भूमिका काय असणार, तसेच पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.






