
सात ते आठ महिन्यांच्या पाठपुराव्याला यश; यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई
पुणे : बालेवाडी स्टेडियमसमोरील महामार्गालगत आणि बालेवाडी सर्व्हिस रोडच्या परिसरात असलेला कचरा डेपो अखेर बंद करण्यात आला आहे. या डेपोमुळे बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसह आजूबाजूच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. तसेच, कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी आंदोलनेही करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश आले असून, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हा डेपो हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मोरेश्वर बालवडकर यांनी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पुणे महानगरपालिका आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या प्रक्रियेत कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाशी समन्वय साधण्यात आल्याचे बालवडकर यांनी सांगितले.
औंध येथील रॅम्पवर कचरा जमा करण्याची व्यवस्था
पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या डीएसआय धनश्री जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील हा कचरा डेपो हलविण्यात आला असून, या ठिकाणी जमा होणारा कचरा औंध येथील रॅम्पवर जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच, ५० पेक्षा अधिक घरांच्या रहिवासी सोसायट्यांना ओला कचरा सोसायटीच्या आवारातच जिरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा वेचकांसाठीही स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येणार असून, त्या ठिकाणाहून त्यांचा कचरा संकलित केला जाईल. यापुढे परिसरातील ज्या सोसायट्यांकडून कचरा नियमबाह्य पद्धतीने टाकला जाईल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जगदाळे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन
कचरा डेपो हटविण्यामुळे परिसरातील दुर्गंधीचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेसोबत नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, ओला आणि सुका कचरा नियमानुसार व्यवस्थापित करावा तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या बाणेर-बालेवाडीकरांसाठी कचरा डेपो हटविण्याचा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. आता या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून परिसर स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्याचे आव्हान महापालिकेसमोर असेल.






