
पुणे : “नवीन खेळाडूंना भविष्यात कबड्डी क्षेत्रात मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर कबड्डी क्षेत्रात आपले नाव आणि लौकिक निर्माण करावा,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांनी केले.
बाणेर येथील कै. सोपानराव कटके मनपा विद्यालयाच्या मैदानावर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि सतेज संस्था, बाणेर यांच्या वतीने आयोजित ५३ व्या कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी किशोरी शिंदे बोलत होत्या.
या स्पर्धेच्या कुमार गटात भैरवनाथ कबड्डी संस्था, भोसरी संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर ओम साई संघ, चिखली संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. प्रकाश तात्या बालवडकर फाउंडेशन, बालेवाडी संघ तृतीय, तर बारामती स्पोर्ट्स अकॅडमी, बारामती संघ चतुर्थ क्रमांकावर राहिला.
कुमारी गटात बारामती स्पोर्ट्स अकॅडमी, बारामती संघाने विजेतेपद मिळवले. प्रकाश तात्या बालवडकर फाउंडेशन, बालेवाडी संघाने द्वितीय, राजमाता जिजाऊ संघ, पुणे संघाने तृतीय, तर ब्रह्मा विष्णू महेश संघ, चिखली संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला खेळ असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंमध्ये या खेळाची मोठी क्रेझ आहे. योग्य मार्गदर्शन, सराव आणि मेहनतीच्या जोरावर नव्या पिढीतील खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्पर्धेचे आयोजक तथा माजी सचिव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन , नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनीही खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. महानगरपालिकांना स्वतंत्र विभाग म्हणून राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याची पूर्वीची व्यवस्था रद्द झाल्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना स्पर्धेची संधी कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पारितोषिक वितरण समारंभास उपायुक्त किशोरी शिंदे, स्पर्धेचे आयोजक बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, प्रकाश तात्या बालवडकर, समीर चांदेरे, अर्जुन शिंदे, राजेश ढमढेरे, अप्पासाहेब दळवी, पूजा कड-चांदेरे, सुजाता समगीर, अर्जुन ननावरे, नासिर सय्यद, सागर खळदकर, सुनील मोरे, महेंद्र धनकुडे, युवराज कोळेकर, पांडुरंग पाडाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कबड्डी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटोळे यांनी केले, तर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर यांनी आभार मानले.







