वाहतूक कोंडीने त्रस्त बाणेर-बालेवाडीकरांना दिलासा; अमोल बालवडकर यांच्या पुढाकाराने सिग्नलची तयारी.


बालेवाडी : बाणेर-बालेवाडी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध चौकांमध्ये नवीन वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याची तयारी सुरू झाली आहे. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या मागणीनंतर ममता चौक येथे नव्या सिग्नल यंत्रणेसाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

बाणेर-बालेवाडी परिसरातील ममता चौक, राधा चौक, ननावरे चौक, बाणेर स्मशानभूमी चौक, कळमकर चौक, दसरा चौक तसेच इतर ठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या चौकांमध्ये वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी अमोल बालवडकर यांनी वाहतूक पोलिसांकडे केली होती.

या मागणीची दखल घेत ममता चौक, बालेवाडी येथे वाहतूक पोलिस निरीक्षक जगदाळे आणि पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे अभियंता प्रल्हाद पवार यांच्या उपस्थितीत नव्या सिग्नल यंत्रणेची तसेच वाहतूक नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

वाहतूक शाखा आणि पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून येत्या चार दिवसांत संबंधित प्रमुख चौकांमध्ये नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर चौकांमधील वाहतुकीचे नियमन अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी कार्यरत असलेल्या ट्रॅफिक वॉर्डनवरील ताणही कमी होणार आहे.

बाणेर-बालेवाडी परिसरात सध्या वाढलेली वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे केवळ सिग्नल यंत्रणाच नव्हे, तर वाहतूक नियोजनाच्या इतर प्रश्नांवरही उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

“प्रभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे बालवडकर यांनी सांगितले.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!