
बालेवाडीमध्ये कचरा व्यवस्थापनावर बालेवाडी वेलफेअर फेडरेशन आणि पुणे महानगर पालिका आरोग्य विभाग संयुक्त बैठक; साई चौक व जकात नाका येथील शेड हटवण्याची मागणी.
पुणे : बाणेर-बालेवाडी परिसरातील कचरा टाकणे, संकलन आणि वर्गीकरणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बालेवाडी वेलफेअर फेडरेशन (BWF) आणि पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभाग, औंध वॉर्ड यांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली.
महापालिकेतर्फे डी एस आय धनश्री जगदाळे, एस आय प्रमोद उकिर्डे आणि एस आय निखिल निकम उपस्थित होते. तर बालेवाडी वेलफेअर फेडरेशनच्या वतीने रमेश रोकडे, मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर, दफेदार सिंह, सचिन पाटील, शैलेश पाटील, वंदना चौधरी, ओमप्रकाश वानखेडे आणि के. एन. पीतांबरन उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच फेडरेशनच्या वतीने साई चौक आणि जकात नाका जवळील सर्व्हिस रस्त्यावरील कचरा संकलन आणि वर्गीकरण शेड हटवण्याची किंवा त्यांचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली. यावर मनपा पथकाने सकारात्मक प्रतिसाद दिला. विविध ठिकाणांहून गोळा केलेला कचरा थेट प्रक्रिया केंद्रावर नेला जाईल, अशी यंत्रणा तयार करण्यात येत असून त्यामुळे वर्गीकरण शेडची गरज भासणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी मोठ्या कॉम्पॅक्टर वाहनांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद आणि नियोजनाची आवश्यकता असून या प्रक्रियेस काही कालावधी लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य असून याबाबत लवकरच नोटिसा पाठवण्यात येणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या सोसायट्यांकडे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा नाही, त्यांनी बाह्य विक्रेत्यांच्या (Vendors) मदतीने हे काम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या च्या पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
रस्ते, पदपथ आणि मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांना सहभागी करून घेऊन बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि पुणे महानगरपालिके च्या घनकचरा व्यवस्थापन टीमच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बालेवाडी गावाजवळील करन सेलेस्टा सोसायटी येथील कचरा समस्येचे फेडरेशन, मनपा टीम आणि सोसायटी कमिटीच्या सक्रिय सहकार्यामुळे प्रभावीपणे निराकरण करण्यात येत असल्याचा दाखला यावेळी देण्यात आला.
कचरा व्यवस्थापनाच्या स्थितीचा आणि पुणे महानगरपालिके ने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दरमहा पाठपुरावा बैठका घेण्याचे ठरले. स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांना भेटण्यासाठी आल्याबद्दल फेडरेशनच्या वतीने धनश्री जगदाळे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात आले. मोरेश्वर बालवडकर यांनी आभार मानले.







