
६ काउंटर, २ स्टॉलसह सिलेंडर, टेन्ट, टेबल व इतर साहित्य जप्त
पुणे : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ मधील अमर टेक पार्कसमोर पदपथावर करण्यात आलेल्या अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणावर पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पदपथावरील अतिक्रमण हटवून सार्वजनिक जागा नागरिकांसाठी मोकळी करण्यात आली.

अमर टेक पार्कसमोरील पदपथावर काही व्यावसायिकांनी अनधिकृतरीत्या काउंटर, स्टॉल, टेन्ट तसेच अन्य साहित्य उभारून व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे पदपथाचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने महापालिका अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान ६ काउंटर, २ स्टॉल, ३ सिलेंडर, २ टेन्ट, ५ टेबल तसेच इतर व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले. महापालिकेच्या पथकाने अनधिकृतपणे उभारण्यात आलेले साहित्य हटवून पदपथ मोकळा केला.
ही कारवाई अतिक्रमण उपआयुक्त सोमनाथ बनकर, परिमंडळ क्रमांक २ चे उपआयुक्त अविनाश सपकाळ आणि सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंढे, सहायक अतिक्रमण निरीक्षक कुणाल राठोड, किरण नवले, अनिल देशमुख आणि माधव बहिरम यांच्या उपस्थितीत कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली.
महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणाला आळा बसला असून, पदपथ नागरिकांसाठी पुन्हा मोकळा झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, संबंधित व्यावसायिकांनी यापुढे सदर ठिकाणी पुन्हा अनधिकृतरीत्या अतिक्रमण करू नये, असे आवाहन पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक पदपथ, रस्ते आणि इतर सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








