
पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा करून आवश्यक मंजुरी आणि शासनस्तरीय पाठबळ मिळावे, यासाठी निवेदन देण्यात आल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
या भेटीदरम्यान शिवाजीनगर मतदारसंघातील पोलीस लाईन्सच्या विकासाचा मुद्दा मांडण्यात आला. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या (MSPHC) माध्यमातून मतदारसंघातील पोलीस लाईन्सचा विकास करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला. ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे आधुनिकीकरण करून त्याठिकाणी ‘इनोव्हेशन अँड स्टार्टअप हब’ उभारण्याची मागणी करण्यात आली.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि महामेट्रो यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्याचा विषयही बैठकीत मांडण्यात आला.
याशिवाय खडकी कॅन्टोन्मेंटचा पुणे महानगरपालिकेत (PMC) समावेश, वाकडेवाडी आणि वडारवाडी येथील महापालिकेच्या हेल्थ कॅम्पचा पुनर्विकास, तसेच औंध येथील ब्रेमेन चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ब्रेमेन चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल किंवा अंडरपास उभारण्याची मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी मांडण्यात आलेल्या विविध विषयांची दखल घेत संबंधित विकासकामांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विकासकामांसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही शिरोळे यांनी सांगितले.








