
पुणे : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, कचरा टाकणे तसेच इतर प्रकारे अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर आता पुणे महापालिका अधिक कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सध्याचे दंडात्मक दर अनेक वर्षांपासून कायम असल्याने त्यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे. दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्याची महापालिकेची तयारी असून, याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांच्या कालावधीत अस्वच्छतेविरोधात तब्बल १६ हजार ५३२ कारवाया केल्या. या कारवायांमधून महापालिकेने सुमारे १ कोटी ८७ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
या कारवाईमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे व अस्वच्छता निर्माण करण्याच्या सर्वाधिक ११ हजार ४९९ प्रकरणांमध्ये ९०.३६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी २ हजार ८२१ कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून ५.७३ लाख रुपये दंड वसूल झाला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याच्या १८८ प्रकरणांमध्ये १.८७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.
याशिवाय उघड्यावर बांधकामाचा राडारोडा टाकल्याप्रकरणी २५६ कारवाया करून ४६.४४ लाख रुपये, प्लास्टिक वापराच्या ५९१ प्रकरणांत ३१.५१ लाख रुपये, तर कचरा जाळल्याच्या ४९ प्रकरणांत ३.३० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
वारंवार कारवाईनंतरही अस्वच्छता कायम
महापालिकेकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात असतानाही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे आणि उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. त्यामुळे केवळ दंडात्मक कारवाई न करता दंडाची रक्कम वाढवून नियमभंग करणाऱ्यांवर अधिक प्रभावी आर्थिक कारवाई करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दंडवाढीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांसमोर चर्चेसाठी मांडण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या दंड तिप्पट करण्याचा अंतिम निर्णय झालेला नसून, दंडवाढीची प्रक्रिया प्रस्तावाच्या टप्प्यात आहे.
शहरातील सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक असून, दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीवर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.








