पुणे : बाणेर रोडवरील रस्ते विकासकामांचा दर्जा आणि टिकाऊपणा सुधारण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य भवनात झालेल्या बैठकीत बाणेर रोडसह गणेशखिंड रोडवरील मेट्रो मार्ग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत रस्त्यांची कामे, प्रलंबित विकासकामे, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षितता तसेच कामांचा दर्जा आणि टिकाऊपणा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बाणेर रोड हा शहरातील महत्त्वाचा वर्दळीचा मार्ग असल्याने या परिसरातील रस्ते विकासकामे आणि वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने या आढाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बैठकीला पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि.) ओमप्रकाश दिवटे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील रस्ते विकासकामे अधिक दर्जेदार आणि टिकाऊ होण्याच्या दृष्टीने या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच मेट्रोच्या कामांशी संबंधित रस्ते विकासकामे, प्रलंबित कामे आणि वाहतूक सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
बाणेर रोड आणि गणेशखिंड रोडवरील कामांच्या गुणवत्तेसह वाहतूक व्यवस्थापनावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्याने या मार्गांवरील विकासकामांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






