
संचेती चौकातील प्रकार; बेदरकारपणे वाहन चालवून ताफ्यात अडथळा निर्माण केल्याचा आरोप
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्यात दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 32 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभम विजय वनित (वय 32, रा. नाना पेठ) असे आरोपीचे नाव आहे. संचेती चौक परिसरात हा प्रकार घडला. मोहोळ यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त सहाय्यक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले यांनी याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुरलीधर मोहोळ पुणे विमानतळावरून कोथरूडकडे जात होते. त्यांचा वाहनांचा ताफा संचेती चौकातून जात असताना संबंधित दुचाकीस्वाराने ताफ्यातील एका वाहनाला कट मारल्याचा आरोप आहे. तसेच इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने दुचाकी बेदरकारपणे आणि वेडीवाकडी चालवल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ताफ्यातील वाहनांकडून सायरन वाजवून सूचना देण्यात आल्यानंतरही दुचाकीस्वाराने ताफ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे ताफ्यातील वाहनांतील व्यक्तींच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकला असता, असे पोलिसांनी म्हटले आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 281 तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला नोटीस बजावली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काठे करीत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांसाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यात दुचाकी घुसवण्याच्या प्रयत्नाची चौकशी सुरू आहे.








