
पुणे : बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम असल्यास नागरिकांनी ते लवकरात लवकर पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत देशव्यापी तीन दिवसांच्या बँक संपाची घोषणा केली आहे. त्यापूर्वी २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँकांच्या शाखांमधील नियमित सेवा सलग पाच दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे.
२१ आणि २२ सप्टेंबर रोजी सरकार, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक संघटनांमध्ये संपाबाबत चर्चा झाली. मात्र, पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याच्या मागणीवर ठोस प्रगती न झाल्याचे UFBUने सांगितले असून, त्यामुळे २८, २९ आणि ३० सप्टेंबरचा संप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२६ ते ३० सप्टेंबरदरम्यान काय स्थिती?
२६ सप्टेंबर, शनिवार : चौथा शनिवार — नियमित बँक सुट्टी
२७ सप्टेंबर, रविवार : साप्ताहिक सुट्टी
२८ सप्टेंबर, सोमवार : UFBUचा देशव्यापी संप
२९ सप्टेंबर, मंगळवार : UFBUचा देशव्यापी संप
३० सप्टेंबर, बुधवार : UFBUचा देशव्यापी संप
त्यामुळे शाखेत जाऊन कराव्या लागणाऱ्या बँकिंग सेवांवर सलग पाच दिवस परिणाम होऊ शकतो. मात्र, संपामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग शाखा किंवा बँकेनुसार वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक शाखा प्रत्यक्षात किती प्रमाणात कार्यरत राहील, हे त्यानुसार बदलू शकते.
कोणत्या सेवांवर परिणाम होऊ शकतो?
संपामुळे रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, चेकशी संबंधित प्रक्रिया, कागदपत्रे सादर करणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता असलेल्या शाखा-आधारित सेवांना विलंब किंवा अडथळा येऊ शकतो.
दुसरीकडे, एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि UPI यांसारख्या डिजिटल सुविधा सामान्यतः सुरू राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, कोणत्याही नियोजित तांत्रिक देखभालीमुळे काही सेवा तात्पुरत्या उपलब्ध नसू शकतात.
पाच दिवसांच्या बँकिंग व्यत्ययाची शक्यता का?
UFBUच्या संपामागील प्रमुख मागणी आठवड्यातून पाच दिवस बँकिंग व्यवस्था लागू करणे ही आहे. याशिवाय पेन्शनशी संबंधित प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक मागण्या तसेच काही कर्मचारी धोरणांबाबतही संघटनांनी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयानेही संप टाळून उर्वरित प्रश्न चर्चेतून सोडविण्याचे आवाहन केले आहे. मात्र, चर्चेनंतरही UFBUने २८ ते ३० सप्टेंबरचा संप पुढे नेण्याची भूमिका कायम ठेवली आहे.
SBIसह बँकांकडून ग्राहकांना सावधगिरीचा सल्ला
संपाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), युनियन बँक आणि इतर बँकांनी ग्राहकांना महत्त्वाचे शाखा-आधारित व्यवहार आधीच पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. एटीएम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, UPI आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे चेक जमा करणे, मोठी रोकड काढणे-जमा करणे, कागदपत्रांशी संबंधित काम किंवा बँक कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता असलेले व्यवहार असल्यास नागरिकांनी ते २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करणे योग्य ठरेल.
टीप : २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान शाखा-आधारित सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे; मात्र सर्व बँका आणि सर्व शाखा पाचही दिवस पूर्णपणे बंद राहतील, असे सरसकट म्हणता येत नाही.






