औंध-बाणेरमध्ये डेंग्यूचा वाढता डंख; २१२ रुग्णांची नोंद.


पुणे : औंध-बाणेर परिसरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, पावसाळ्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या परिसरात डेंग्यूचे तब्बल २१२ रुग्ण आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

 

पुणे शहरात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे एकूण २ हजार ३९१ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये जूनमध्ये १६६, जुलैमध्ये ५१८, ऑगस्टमध्ये ७५१, तर सप्टेंबरमध्ये तब्बल ९५६ रुग्णांची नोंद झाली आहे. पावसाळ्यानंतर डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

औंध-बाणेर परिसरात डेंग्यूसोबतच चिकुनगुनियाचेही रुग्ण आढळले आहेत. या भागात चिकुनगुनियाचे १९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, त्यापैकी काही रुग्ण एकाच गृहनिर्माण सोसायटीतील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

 

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. घरांची, सोसायट्यांची, बांधकामस्थळांची तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी अळीनाशकाची फवारणी आणि धूरफवारणी करण्यात येत आहे.

 

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे तसेच कुंड्या, टायर, भंगार साहित्य आदी ठिकाणी साचलेले पाणी नियमितपणे काढणे आवश्यक आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!