
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देण्याची संधी; प्रत्येक बसमध्ये मार्गदर्शकाची नियुक्ती
पुणे : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळांना भेट देण्यासाठी वातानुकूलित (एसी) इलेक्ट्रिक बसद्वारे विशेष पर्यटन सेवा सुरू केली आहे. अवघ्या ५०० रुपये प्रति प्रवासी या दरात नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार असल्याने सहकुटुंब पर्यटनासाठी हा एक किफायतशीर पर्याय ठरणार आहे.
ही पर्यटन बससेवा दर शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी उपलब्ध असणार आहे. प्रवाशांची मागणी असल्यास इतर दिवशीही बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवास अधिक माहितीपूर्ण आणि आनंददायी व्हावा, यासाठी प्रत्येक बसमध्ये मार्गदर्शक सेवकाची (गाइड) नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यटनस्थळांची माहितीही मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरासाठी दोन पर्यटन मार्ग
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी दोन विशेष पर्यटन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या मार्गात रावेत येथील इस्कॉन मंदिर, चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर, देहू येथील गाथा मंदिर आणि भंडारा डोंगराचा पायथा या स्थळांचा समावेश आहे. दुसऱ्या मार्गात भोसरीमार्गे चाकण, राजगुरुनगर, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ आणि गजानन महाराज मठ या ठिकाणांना भेट देता येणार आहे.
आठ ठिकाणी बुकिंगची सुविधा
या पर्यटन सेवेसाठी पुणे स्टेशन, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन येथे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी नागरिकांनी पीएमपीएमएलच्या मध्यवर्ती पास विभागाशी ०२०-२४५०३२३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पूर्ण बस आरक्षित केल्यास विशेष सवलत
३३ प्रवाशांच्या संपूर्ण गटाने एकत्रितपणे पूर्ण बस आरक्षित केल्यास पाच प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीइतकी म्हणजेच १०० टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे. अपुरा प्रतिसाद किंवा अपरिहार्य कारणास्तव एखाद्या दिवशी बससेवा रद्द झाल्यास संबंधित प्रवाशांना पुढील शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रवासाची संधी दिली जाणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये स्वतःचे वाहन न वापरता, कमी खर्चात आणि आरामदायी पद्धतीने पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी पीएमपीएमएलची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी या पर्यटन बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






