
१७ हजार विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची संधी; राज्य शासनाकडून आठ शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र मंजूर
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या आठ शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आठ शाळांना महाराष्ट्र शासनाने ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले असून, या निर्णयामुळे सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
खासगी शाळांमधील वाढते शैक्षणिक शुल्क आणि प्रवेशासाठी होणारा मोठा खर्च यामुळे सर्वसामान्य पालकांसमोर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू झाल्यास खासगी शाळांना एक पर्याय उपलब्ध होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याची संधी मिळू शकणार आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक पद्धतीची ओळख व्हावी, तसेच स्पर्धात्मक परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या संधींसाठी त्यांची तयारी व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. इंग्रजी माध्यमातून सीबीएसई अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रस्तावासाठी महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि शिक्षण समिती अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून शासनाकडून आठ शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
या आठ शाळांमध्ये सुरू होणार सीबीएसई अभ्यासक्रम
१. कै. बबन गबाजी टिंगरे शाळा, मुंजाबा वस्ती, धानोरी.
२. कै. रामचंद्र बनकर विद्यालय, गोंधळेनगर, हडपसर.
३. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल, कर्वेनगर.
४. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूल, येरवडा.
५. महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, वानवडी.
६. कै. खासदार विठ्ठलराव तुपे पाटील स्मार्ट लर्निंग स्कूल, डी.पी. रोड, हडपसर.
७. कै. प्रगती प्रकाश कदम ई-लर्निंग स्कूल, गोकुळनगर, बिबवेवाडी.
८. श्री. शरदचंद्रजी पवार ई-लर्निंग इंग्लिश मीडियम स्कूल, वडगाव बुद्रुक.
पालकांचे लक्ष अंमलबजावणीकडे
या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता आणि प्रवेश प्रक्रिया कशी असेल, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे. या सुविधा प्रभावीपणे उपलब्ध झाल्यास पुण्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचा नवा पर्याय खुला होणार आहे.






