
वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान तीन वेळा केबल तुटल्या; औंध, बाणेर, महाळुंगेतील वीजपुरवठ्याला धोका
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात भूमिगत वीजवाहिन्यांचे वारंवार नुकसान होत असल्याने महावितरणने संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १६, १७ आणि ३१ ऑक्टोबर रोजी तीन वेळा केबलचे नुकसान झाल्याने महावितरणला लाखोंचा आर्थिक फटका बसला असून, वीजग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान महामार्ग आणि सेवा रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या भूमिगत वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे आवश्यक असताना, पूर्वसूचना देऊनही ते न करता काम सुरू ठेवल्याचा महावितरणचा आक्षेप आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड हद्दीतील कामासाठी मंजुरी घेण्यात आली असली, तरी पुणे महापालिका हद्दीतील कामासाठी परवानगी घेतलेली नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन वेळा केबलचे नुकसान
१६ ऑक्टोबरला २२ केव्ही बेव्हर्ली फिडर, १७ ऑक्टोबरला बिटवाइज चौकातील २२ केव्ही निया फिडर आणि ३१ ऑक्टोबरला पुन्हा भूमिगत केबलचे नुकसान झाले. या घटनांमुळे दुरुस्तीचा खर्च वाढण्याबरोबरच वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
औंध, बाणेर, महाळुंगेतील ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता
वीजवाहिन्या काँक्रीटच्या रस्त्याखाली गाडल्या गेल्यास भविष्यात बिघाड शोधणे आणि दुरुस्ती करणे कठीण होणार आहे. अशा वेळी रस्ता खोदावा लागण्याची शक्यता असून, औंध, बाणेर आणि महाळुंगे परिसरातील मोठ्या संख्येने वीजग्राहकांचा पुरवठा बाधित होऊ शकतो.
या प्रकरणी महावितरणच्या बाणेर शाखा कार्यालयाने २७ ऑक्टोबर रोजी बावधन पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.








