
पुणे : बाणेर येथील रहिवासी आणि पुण्यातील राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी शिवराम सायकर हिची तैवान येथे होणाऱ्या पाचव्या आशियाई युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला सॉफ्टबॉल संघात निवड झाली आहे. वैष्णवीच्या या निवडीमुळे बाणेरसह पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय संघाच्या निवडीसाठी जुलै महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथे दुसरी निवड चाचणी पार पडली. या दोन्ही निवड चाचण्यांमधील कामगिरीच्या आधारे भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
भारतीय संघाचे पहिले सराव शिबिर कोपरगाव येथे पार पडले असून, दुसरे सराव शिबिर दिल्ली येथे होणार आहे. दिल्लीतील सराव शिबिरानंतर भारतीय संघ २० ऑक्टोबर रोजी तैवानकडे रवाना होणार आहे. तैवान येथे २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आशियाई युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल स्पर्धेतील सामने होणार असून, या स्पर्धेत वैष्णवी सायकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
वैष्णवी सायकर ही आझम कॅम्पसची विद्यार्थिनी असून, ती पुणे सिटी संघाकडून सॉफ्टबॉल खेळते. राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आता तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
वैष्णवीच्या या यशामागे आझम कॅम्पसचे प्राध्यापक गुलजार शेख, पुणे सिटी असोसिएशनचे सचिव अतुल शिंदे तसेच विष्णू जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
बाणेरसारख्या पुण्यातील परिसरातून राष्ट्रीय स्तरावर मजल मारत आता भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या वैष्णवीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या भारतीय संघातील निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून, तैवानमधील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.








