
पुणे : सोशल मीडियावर व्हायरल होणारी कोणतीही रील, ऑडिओ क्लिप किंवा मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी त्याची अधिकृत खातरजमा करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे. पुणे शहरात अवघ्या २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा करणारी रील आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, हा दावा तथ्यहीन आणि निराधार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या रील आणि ऑडिओ क्लिपची पुणे पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. यासाठी ऑडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याबरोबरच संबंधित सोसायटीचे व्यवस्थापन, शेजारी तसेच इतर संबंधित व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली आहे.
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचे सिद्ध करणारी कोणतीही अधिकृत नोंद किंवा ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या अफवेचा नेमका स्रोत कोणता आहे आणि व्हायरल करण्यात आलेल्या दाव्यामागील वस्तुस्थिती काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपासादरम्यान नवीन माहिती किंवा पुरावे समोर आल्यास त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
मे महिन्यातील आकडेवारीशी संबंध जोडणे चुकीचे
विशेष म्हणजे, मे २०२६ मध्ये पुण्यात १ ते २२ मेदरम्यान १२३ महिला व मुली बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, या आकडेवारीचा सध्याच्या “२२ तासांत १२३ मुलींचे अपहरण” या सोशल मीडिया दाव्याशी थेट संबंध जोडणे चुकीचे ठरू शकते. बेपत्ता होणे आणि अपहरण होणे या वेगवेगळ्या बाबी असून, त्यांची सरसकट सांगड घालणे दिशाभूल करणारे ठरू शकते.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही रील, ऑडिओ क्लिप किंवा मेसेज सोशल मीडियावर पुढे पाठवण्यापूर्वी त्याची अधिकृत माहिती तपासावी. अफवा किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित केल्याने नागरिकांमध्ये अनावश्यक भीती आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात.








