अधिकारी अनुपस्थित, वीज उपकरणे सुरूच; औंध क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार चर्चेत.


पुणे : औंध क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतानाही पंखे आणि दिवे सुरू असल्याचा आरोप आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी केला आहे. या प्रकारावर त्यांनी नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनाने विजेच्या वापराबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे.

 

कामानिमित्त औंध क्षेत्रीय कार्यालयात गेल्यानंतर आरोग्य विभागात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसतानाही विभागातील दिवे आणि पंखे सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे कानवटे यांनी सांगितले. सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारे विजेचा अपव्यय होणे योग्य नसून, त्याचा आर्थिक भार शेवटी सर्वसामान्य करदात्यांवर पडतो, असे त्यांनी म्हटले.

 

“सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा आणि जनतेच्या पैशांचा अशा प्रकारे अपव्यय होणे चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे. वीजबिलाचा खर्च अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या खिशातून जात नसून, तो सर्वसामान्य नागरिकांच्या करातून भागवला जातो,” असे ऋषिकेश कानवटे यांनी सांगितले.

 

सार्वजनिक मालमत्ता आणि सरकारी निधीचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. संबंधित प्रकरणाची चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 

तसेच महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असताना दिवे, पंखे आणि अन्य विद्युत उपकरणे बंद ठेवण्यासाठी स्पष्ट नियमावली लागू करावी, अशी मागणी कानवटे यांनी केली आहे.

 

हा प्रकार तातडीने थांबवला नाही तर आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


12
कृपया वोट करा.

पुणेकर LIVE च्या बातम्यांवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!