
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा.
बालेवाडी| पुणे : बालेवाडी परिसरातील मूलभूत नागरी समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या वतीने १० हजार नागरिकांच्या सह्यांची पत्रे पंतप्रधान कार्यालयासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ फेडरेशनच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. विविध विषयांवर चर्चा आणि आगामी उपक्रमांचा आढावा घेत ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेत सचिव आशिष कोटमकर यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. अध्यक्ष रमेश रोकडे यांनी फेडरेशनचा पाचवा वार्षिक अहवाल सादर करताना २०२५-२६ या वर्षात फेडरेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली.
खजिनदार दफेदार सिंह यांनी आर्थिक विवरणपत्रे तसेच आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सभेसमोर मांडले. यास उपस्थित सभासदांनी मान्यता दिली.
८० जी प्रमाणपत्रासाठी संदीप मंडोलिया यांचा सत्कार
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनला नुकतेच आयकर विभागाकडून ८० जी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत फेडरेशनचे सदस्य संदीप मंडोलिया यांनी विनामोबदला सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल सभेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक
फेडरेशनच्या माध्यमातून पर्यावरण, पाणी, ग्राहक मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचे उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी कौतुक केले.
पर्यावरण संवर्धन आणि नदी वाचविण्यासाठी कार्य करणाऱ्या वंदना चौधरी, ग्राहक मार्गदर्शन केंद्र चालविणाऱ्या ॲड. रुपाली रायकर, पाणी वाचवा अभियान राबविणाऱ्या शुभांगी चपाटे, पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास करणारे यश चौधरी तसेच फेडरेशनच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळणारे योगेश डुंबरे यांच्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
१० हजार नागरिकांच्या सह्यांची मोहीम
बालेवाडी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, नागरी सुविधा आणि इतर मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशनच्या वतीने नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १० हजार नागरिकांच्या सह्यांची पत्रे संकलित करून ती पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहेत.
तसेच स्थानिक आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही नागरिकांच्या सह्यांची पत्रे देण्यात येणार आहेत. या माध्यमातून बाणेर-बालेवाडी परिसरातील मूलभूत समस्यांना शासनाच्या पातळीवर वाचा फोडण्याचा प्रयत्न असल्याचे फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.
नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे
बालेवाडी परिसरातील विविध नागरी प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे फेडरेशनच्या सामाजिक आणि नागरी उपक्रमांमध्ये अधिकाधिक सभासदांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष मोरेश्वर बालवडकर यांनी केले. उपस्थित सभासदांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.








