पुणे : बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील मोकळ्या मैदानात बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला बाणेर पोलिसांनी अटक केली. आदित्य दशरथ औचरे (वय २२, रा. शिवनेरी पार्क, लेन क्रमांक ३, बालेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
बाणेर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश भोंडणे यांना २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बातमीदारामार्फत बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील मोकळ्या मैदानात एक तरुण अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला.
यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ काळ्या रंगाचे लोखंडी अग्निशस्त्र आणि त्याच्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली. अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी शस्त्र व काडतुसे जप्त केली.
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ नुसार आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहरचे मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ चे चिलुमुला रजनीकांत आणि सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभागचे ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकान, गणेश रायकर तसेच पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे, प्रदीप खरात, गजानन अवातिरक, स्वप्नील मराठे, गणेश भोंडणे आणि समीर पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.






